कँँप दापोलीतील विठ्ठल रखुमाई मंदिर. हे मंदिर एकशे चोवीस वर्षे जुने आहे. नंदकिशोर भागवत यांचे पणजोबा कै.विनायक सखाराम भागवत यांनी १८९४ साली स्वतःचे चौदा हजार रुपये खर्चून हे देऊळ बांधून घेतले. त्यांची विठ्ठलावर अपार श्रद्धा होती. ते पेशाने वकील होते. १८७९ सालची त्यांना सनद प्राप्त होती. दापोलीत त्यांची वकिली उत्तम चालायची. विवाहोत्तर संसार देखील सुखाचा चाललेला; परंतु खंत एवढीच होती की त्यांना संतानप्राप्ती होत नव्हती. सगळे उपाय निरुपाय झाले. दुसरा विवाह करणे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे शेवट मृत्यू पश्चात देखील आपले नाव लोकस्मरणात रहावे म्हणून त्यांनी मंदिर बांधायचे ठरवले. मंदिराबरोबर स्वतःच्या समाधीचीही व्यवस्था करून घेतली.
तो काळ ब्रिटीश सत्तेचा होता. समाधिस्थ जाणे म्हणजे आत्महत्या, असा त्यांचा समज असल्यामुळे त्यांनी या गोष्टीला कायदेशीर प्रतिबंध आणला होता. तरीही कोंकब्यातील जोशी नामक एका संन्यास्याकडून विनायक भागवतांनी संन्यास स्वीकारला आणि १९०८ मध्ये समाधी घेतली. विठ्ठल मंदिरासमोरील शिवपिंडाखाली त्यांची आजही समाधी आहे. समाधी घेण्यापूर्वी १९०० साली त्यांनी स्वतःचे मृत्यूपत्र केले व त्यात देवस्थानची कायम उत्तम व्यवस्था राहील या दृष्टीने विचारपूर्वक तरतूद करून ठेवली. सध्या नंदकिशोर भागवत मंदिराचे व्यवस्थापन पाहतात. तत्पूर्वी त्यांचे वडील व आजोबा पाहत होते.
विनायकरावांनी बांधलेलं विठ्ठल मंदिर आजही जसच्या तसं आहे. १९९४ साली मंदिराचा शतकी महोत्सव होता ,तेव्हा फक्त थोडीशी डागडूूजी करण्यात आली. पूर्वी मंदिर परिसरात दोन विहिरी होत्या, त्यातील मंदिरामागे असलेली चंद्रभागा नावाची अर्धवर्तुळाकार विहीर पाणी आटल्यामुळे बुजवण्यात आली. दुसरी विहीर मात्र अजून तशीच आहे. त्या विहिरीवर पूर्वी बैल रहाट होता. त्या बैल रहाटाद्वारे पाणी मंदिरापासून जवळ राहणाऱ्या चार-पाच महार घरांना मिळत असे. गोखले कन्याशाळेच्या बांधकामासाठी देखील याच विहिरीतील पाणी वापरण्यात आले. मंदिराच्या प्रशस्त जागेत असलेला त्रिपुर, शिवमंदिर आणि समाधीचा भाग १९९४ साली पुनर्विकसीत करण्यात आला. पुढल्या वर्षी २०१९ ला मंदिरास सव्वाशे वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा भागवत कुटुंबीयांचा विचार आहे.
मंदिरात आषाढी, कार्तिकी, जन्माष्टमी, काला, इ.धार्मिक उत्सवाचे कार्यक्रम पार पडत असतात.याशिवाय अनेक मंडळ, संघटना व समाजाची सभा-सम्मेलने होत असतात. त्यामुळे विठ्ठल मंदिर हे कँप दापोलीतील एक महत्त्वाचे देवस्थान व महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळेच सन १८९९ च्या दापोलीच्या नकाशात देखील या मंदिराचा उल्लेख आलेला आहे.
सुंदर माहीती. दापोली मध्ये येणे झाले तर नक्की दर्शन घेऊ. ॐ श्री पांडुरंग हरी । श्री वासुदेव हरी ॥
* वरील लेखा वर मी काही टीपण्णी केली आहे ती पाहावी.
* आपला संपर्क क्रमांक चालत नाही का? केव्हांच प्रतिसाद मिळत नाही.