महाराष्ट्रात मोडी लिपी ही १३ शतकापासून २० शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषा लेखनाची प्रमुख लिपी होती. तिला सरकारी दर्जा प्राप्त होता. पुढे आंग्ल काळात लेखनासाठी छपाई यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्यानंतर मोडी छपाईसाठी अवघड आणि गैरसोयीची असल्यामुळे तिचा वापर बंद झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही कालबाह्य लिपी म्हणून मोडिकडे कोणी फारसं लक्ष दिल नाही. परंतु मराठीची असंख्य कागदपत्रे मोडी लिपीत असल्यामुळे इतिहास संशोधकांना मोडी लिपी जाणकारांची गरज भासू लागली. आजही ती निकड फार मोठी आहे.
दापोलीत जालगांवात राहणारा ‘तेजोनीध कुलदिपक रहाटे’ हा गेली दहा वर्षे मोडी लिपीसाठी कार्य करीत आहे. तो नगरपंचायत, तहसीलदार कार्यालय, न्यायालय अशा सरकारी ठिकाणी व खाजगी मसल्यांमध्ये देखील एक मोडी जाणकार म्हणून मदत करतो. तेजोनीधचं प्राथमिक शिक्षण दापोलीच्या ‘आर.आर.वैद्य’ शाळेत, माध्यमिक ‘ए.जी.हायस्कूल’ मध्ये आणि महाविद्यालयीन ‘एन.के.वराडकर’ मध्ये झालं. जेमतेम सहावी सातवीत असताना तो जालगांवातल्या ‘शिवराम रामचंद्र दांडेकर’ यांच्याजवळ मोडी शिकू लागला. ते पेशाने शिक्षक होते व मोडीबाबतचा अभ्यास त्यांचा दांडगा होता. मोडी लिपी शिकण्यास फार कठीण नसली तरी, तिला सराव फार आवश्यक आहे. तो सराव तेजोनीधने सातत्याने चालू ठेवला आणि वयाच्या चौदाव्या वर्षी ‘पुराभिलेख संचालनालय’ कडून घेतल्या जाणाऱ्या मोडी लिपीच्या परीक्षेत दुसरा क्रमांक पटकवला. या परीक्षेला एकूण २४० मुले बसली होती. परीक्षा कोल्हापूरात पार पडली.
तेजोनीध खरतर या परीक्षेसाठी अपात्र ठरत होता. कारण, परीक्षेला बसण्यासाठी वयाची अठरा वर्षे पूर्ण असावीत, १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण असावे, उमेदवार सरकारी कर्मचारी असावा, अशा तीन अटी होत्या आणि तेजोनीध यापैकी एकाही अटीत बसत नव्हता. तेव्हा त्याने परिक्षा अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आणि “आत्म्परीक्षेसाठी मला परिक्षा द्यायची आहे.’’ असे निवेदन केले. त्या पत्रामुळे तेजोनीधचा अर्ज मंजूर झाला व ‘गणेश मोरजी खोडके’ नामक शिक्षकाकडून परीक्षेस बसण्याची परवानगी मिळाली. २००७ साली तो ती परिक्षा उत्तीर्ण झाला व २००८ पासून त्याने ‘मोडी जाणकार’ म्हणून कामास सुरुवात केली.
मोडी लिपीचा प्रचार-प्रसार व्हावा, लोकांना या लिपीच प्रशिक्षण मिळावं म्हणून तेजोनीध अनेक ठिकाणी व्याखाता म्हणून जातो, प्रशिक्षणाचे वर्ग घेतो, लोकांना मोडी संदर्भात आवश्यक ती मदत करतो. त्याचे आतापर्यंत चार प्रशिक्षण वर्ग झाले आहेत. त्यातील तीन ‘एन.के.वराडकर’ मध्ये आयोजित केलेले होते आणि एक दाविक्षे प्रेस फाउंडेशनने आयोजित केला होता.
तेजोनीध सध्या मोडी लिपीबरोबरच उर्दू भाषेतील ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण, बरेचसे जुने दस्तावेज जे असतात, त्यांमध्ये मराठी इतकेच उर्दूचे शब्द आढळून येतात आणि उर्दू भाषा ज्ञात नसेल तर तो मजकूर समजण्यास मोठी अडचण निर्माण होते. याशिवाय तो आयुर्वेदाचा देखील अभ्यास करतो आहे. त्या अभ्यासात मोडी लिपी जाणकार असल्याचा त्याला प्रचंड फायदा होतो.
तेजोनिधचं आजचं वय केवळ पंचवीस वर्षांचे आहे. नव्या पिढीतील असून सुद्धा तो जुन्या काळातल्या, कालबाह्य झालेल्या लिपीकडे वळला आणि ही लिपी भविष्यात अगदीच नामशेष होऊ नये म्हणून आज प्रयत्न करतोय, ही गोष्ट खरोखर अधोरेखीत करण्यासारखी आणि अभिमानास्पद आहे. दापोलीतल्या तरुण मुलांनी या गोष्टीची नोंद अवश्य घेतली पाहिजे.