काटखेळ

2
6464


महाराष्ट्रात असंख्य ग्रामदैवत आहेत. पण या ग्रामदेवते बद्दल अपार श्रद्धा ठेवणारी माणस जर कुठे आढळतील; तर ती केवळ ‘कोकणात’. ग्रामदेवता ही कायम गावाचे रक्षण करते. गावातल्या लोकांना सुख, शांती आणि समृद्धी देते, असा इथल्या लोकांचा समज आहे. त्यामुळे या ग्रामदेवतेला प्रसन्न ठेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी तिची भक्ती केली जाते. या धार्मिकतेतूनचं आपल्याकडे अनेक लोककला जन्माला आल्या आहेत. आणि त्यामुळे निव्वळ कोकणाची नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंस्कृती संपन्न झाली आहे. दापोली तालुक्यातील खेर्डी या गावात तेथील ग्रामदैवत ‘श्री चंडिकादेवी’ हिच्याशी जोडलेला एक आगळावेगळा लोककला प्रकार पाहायला मिळतो. तो म्हणजे ‘काटखेळ’. हा काटखेळ प्रामुख्याने शिमग्यात खेळला जातो. देवीची पालखी देवळातून निघून पुन्हा देवळात येईपर्यंत जिथे-जिथे थांबेल, तिथे-तिथे हा काटखेळ सादर होतो. या काटखेळाचा इतिहास असा सांगितला जातो की, ‘श्री चंडिका’ देवीचा हा काटखेळ शिवकालपूर्व आहे. शिवकाळात मराठी मावळे या काटखेळाद्वारे गुप्त संदेश एकमेकांपर्यंत पोहचवित असत. काटखेळींच्या नृत्यात आणि गाण्यात सांकेतिक शब्द व सांकेतिक खुणा असत, त्यातून हा व्यवहार चाले.

चंडिका देवीचा हा काटखेळ अत्यंत मानाचा समजला जातो. तो सादरकर्त्यांना काटखेळी म्हणून संबोधलं जात. हे काटखेळी केवळ पुरुषचं असतात आणि तेही विवाहित. काटखेळ सादरीकरणासाठी या काटखेळीनं विशेष असा ‘अर्धनारीनटेश्वरी’ पोशाख करावा लागतो. हा पोशाख धारण करणाऱ्याला याची पवित्रता राखणं अत्यंत बंधनकारक असतं. म्हणजे काटखेळीने व्यसन करू नये, अपशब्द बोलू नये, लोभ धरू नये अशा अनेक गोष्टी आहेत. यामुळेच काटखेळींना देवासारखा मान मिळतो.

काटखेळाचं सादरीकरण म्हणजे सामुहिक नृत्य आणि सामुहिक गायन. झांज, पकवाज किंवा मृदुंग या वाद्यांच्या तालावर. हातात काठ्या असतात त्यांचा लय कवणाच्या चालीनुसार. नृत्य व गाणी जशीच्या तशी पारंपारिक. त्यामुळे एक अस्सल लोककला. ज्यामध्ये सादरकर्ते व प्रेषक दोन वेगळे गट नाहीत. सगळे एकरूप होतात आणि भक्ती रसात न्हाऊन निघतात.

2 COMMENTS

  1. फार चांगली माहिती.मी जालगांव ब्राह्मणवाडीचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here