तुणतुणे – पारंपारिक तंतुवाद्य

0
2626

“तुण्…तुण्….तुण्….तुण्…. तुणतुण्यामधून निघणारे हे नाद आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन न गेले तरच नवल! तुणतुणे हे खरे तर खूप साधे व वाजवायलाही तितकेच सोपे असे पारंपारिक तंतुवाद्य. पूर्वी कोकणात सुगीच्या दिवसांत प्रत्येक गावात असे तुणतुणेवाले फिरताना दिसत. हातातले तुणतुणे वाजवित कधी ज्योतिष सांगताना तर कधी देवादिकांच्या नावाने आरती गाताना, ज्या घरासमोर थांबतील त्या घरातल्या पुर्वजांच्या नावांची आठवण करीत गीत गाताना हमखास दिसत. डोक्याला पागोटे, कपाळाला टीळा, गळ्यात उपरणे, धोतर व सदरा या वेषातील तुणतुणेवाला त्याच्या पेहरावाबरोबरच हातातल्या तुणतुण्यामधून निघणाऱ्या कर्णमधुर सुरांमुळे लांबूनही ओळखता येई.

महाराष्ट्रातील सरोदे किंवा गोंधळी समाजात हे तुणतुणे नावाचे वाद्य सर्रास पाहावयास मिळते. पांगारा नावाच्या झाडाच्या खोडापासून बनविलेल्या एका डबासदृश आकाराच्या पोकळ खोडाला खालून चामडे ताणून व एका उभ्या काठीला खिळीत तार गुंडाळून व ती तार खालच्या चामड्यात घुसवून ताणून ओढल्यावर हे तुणतुणे नावाचे तंतुवाद्य बनवले जाते. ताणलेली तार अधिक ताठ वा सैल करण्यासाठी वर उल्लेख केलेल्या खिळीचा वापर करतात. तार अधिक ताणली तर वरचा सूर व जशी कमी ताणावी तसा खालचा सूर अशी ही साधीसोपी रचना असते. अशी ताणलेली तार हिरकुटाने किंवा बोटाने छेडल्यावर या तारेतून वातावरणाला भारून टाकणारा कर्णमधुर नाद उमटतो. याच नादाच्या साथीने तुणतुणेवाला पोवाडे, गण, गौळण, कथा, आख्यायिका, गीत सादर करतो.

तुणतुण्याचा वापर करीत वरील गीते सादर करण्याची कला सरोदे किंवा गोंधळी समाजाकडे पिढीजात प्रचलित आहे. सरोदे या नावाचा अर्थच मुळात सरोद म्हणजे तुणतुणे वाजवणारा असा आहे. सरोदे म्हणजेच ज्योतिष सांगणारा असाही एक अर्थ सरोदे या संज्ञेविषयी सांगितला जातो. पुर्वी तुणतुणे वाजवतानाच एखाद्या घराचे वा घरातील व्यक्तींचे ज्योतिष सांगून सोबत मनोरंजनपर लोकगीतगायन करुन तुणतुणेवाले त्यांचा चरितार्थ चालवित. गावोगाव फिरुन तुणतुणे छेडीत गीतगायन व आख्यायिका कथन करणाऱ्या अशा तुणतुणेवाल्यांना समाजातही खूप मान होता. आई भवानीचे निस्सीम भक्त व आई भवानी मातेचे शाहीर अशीच त्यांची विशेष ओळख आजही आहे. आजही तुणतुणेवाला किंवा सरोदे समाज स्वतःला भवानी मातेचे निस्सीम भक्त मानतो.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात व स्वराज्याचा विस्तार करताना या तुणतुणेवाल्या सरोदे समाजाचा अतिशय उत्तम प्रकारे उपयोग करुन घेतला. या समाजाचे सामाजिक योगदान लक्षात घेऊन छत्रपती शिवरायांनी काही ठराविक सुभ्यांची वतनदारीही या सरोदे समाजाकडे सोपवली होती. आजही याबाबतीत कोकणातील दाभोळ सुभ्याचा ‘सरोद्याचा सुभा ‘ असाच उल्लेख आढळतो. गनिमांच्या गोटातली गुप्त व महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अशा सरोद्यांना शत्रूच्या गोटात पाठवित. केवळ शाहीर अशीच ओळख असल्याने शत्रूला त्यांच्या वावराबद्दल तसूभरही संशय येत नसे. बहिर्जी नाईकही अनेक गुप्त मोहीमेंवर तुणतुणेवाला बनून गेल्याचे उल्लेख आढळतात.

मनोरंजनासोबतच लोकप्रबोधन करण्याचे महत्वाचे कार्य तुणतुणेवाल्यांनी केले आहे. इतिहासात अजरामर झालेल्या कर्तुत्ववान व्यक्तींचे पोवाडे, कवने गातानाच  हा चालता बोलता इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवण्याची कामगिरी या तुणतुणेवाल्यांनी केली आहे. पुर्वी तुणतुणेवाले गावोगाव फिरतानाच गोंधळी म्हणूनही काम करीत होते. भवानी मातेचा गोंधळ घालण्यासाठी अनेक गावांमधून त्यांना बोलवणे येत असे. एखाद्या शुभकार्याच्या निमित्तानेही भवानी मातेचा गोंधळ घालण्याची प्रथा आजही अस्तित्वात आहे. संपूर्ण रात्रभर मशालीच्या उजेडात कथा व आख्यायिकांचे त्यांच्या पारंपारिक खास शैलीत गायन करून उपस्थितांचे मनोरंजन करण्याची कामगिरी आजही ते पार पाडत आहेत. शुभकार्याबरोबरच एखाद्या देवभक्त व्यक्तीच्या निधनानंतरच्या शोकसभेत त्या व्यक्तीची महती सांगणारी गीते गातानाच मनोरंजन करण्याचे  व दुःखाचा भार हलका करण्याचे कामही असे गोंधळी करतात. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुणतुणे हे अगदी अविभाज्य वाद्य असते. पुर्वी सरोदे समाज हा बहुतांश अशिक्षित होता. पोवाडे, लोकगीते, कवने, आख्यायिका यांच्या माध्यमातून सरोदे समिजातली ही पारंपारिक कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने जात राहिली. मात्र गेल्या काही वर्षांपासून सरोदे समाजही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाल्यामुळे नोकरीधंद्यात शिरलेला सरोदे समाज आजच्या घडीला तुणतुण्यापासून खूप दूर गेला आहे. बदलत्या व आधुनिक राहणीमानात त्याला ही पिढीजात कला जोपासणे शक्य होत नाही. आजच्या पिढीकडे आता त्याविषयी तितकीशी आवडही नाही. मात्र अशा अवस्थेतही काहीजण तुणतुणे वाजवण्याबरोबरच या पारंपरिक लोककलेचे जतन करताना दिसतात.

भटक्या व विमुक्त समाजाचे ज्येष्ठ नेते व ज्येष्ठ इतिहास संशोधक दादा इदाते यांच्याकडे या समाजातील चालीरीतींचा व सांस्कृतिक ठेव्याचा खूप अभ्यासपूर्ण ठेवा आहे. या समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे फार मोठे कार्य आदरणीय दादा इदाते यांनी केले आहे. भटक्या व विमुक्त महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी या समाजाला अनेक शासकीय सोयीसुविधा व सवलती मिळवून दिल्या आहेत.हे करीत असतानाच त्यांनी या सरोदे समाजाचा सांस्कृतिक वारसा जपून ठेवण्याचेही महत्त्वपूर्ण काम केले आहे. दापोली तालुक्यातील असोंड, टेटवली, वेळवी यांसारख्या गावातील गोंधळी किंवा सरोदे किंवा संगमेश्वर पट्ट्यातील भूते समाजाने हे तुणतुणे अजुनही जीवंत ठेवले आहे हे विशेष.  म्हाळुंगे येथील श्री कारंडे , टेटवली येथील श्री रसाळ आणि तालुक्यातील इतर ही काही मंडळी आज ही विविध ठिकाणी गोंधळाचे व जागराचे कार्यक्रम करतात. या कलेचा आदर करणारे काही मोजकेजण आजही भवानी मातेच्या गोंधळासारखे पारंपारिक कार्यक्रम करून समाजाचे मनोरंजन व प्रबोधन करीत आहेत. पुर्वीच्या काळात समाज प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या, मात्र आजच्या काळात कालबाह्य किंवा प्रसिद्धीपासून खूप दूर राहिलेल्या या तुणतुणेवाल्यांच्या कलेचा आस्वाद व त्यांचा जाज्वल्यपूर्ण इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी अशा सर्वच पारंपारिक कलांची खाण असलेल्या दापोलीस अवश्य भेट द्यायलाच हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here