पूज्य साने गुरुजी स्मृतीभवन, पालगड

1
3623

‘श्यामची आई’ या कादंबरीमुळे साने गुरुजी आज समस्त जगाला परिचित आहेत. आजच्या सोशल नेटवर्किंग आणि चॅटिंगच्या जमान्यात जिथे वाचनाकडे दुर्लक्ष होते, तिथे साने गुरुजींच्या साहित्याची मागणी कायम आणि उलट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचे साहित्य कॉपीराईटमुक्त झाल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकाशकांकडून प्रसिद्ध झाले आहे आणि सर्वच पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. गुरुजींच्या स्मृती जशा पुस्तकातून जीवंत आहेत, तशाच वास्तूमधून देखील जीवंत राह्व्यात म्हणून त्यांच्या जन्मगावी पालगड, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे १९९८ साली गुरुजींच्या घराचे रुपांतर स्मृती भवनात करण्यात आले. २४ डिसेंबर १९९८ रोजी गुरुजींच्या जन्मशताब्दीचे औचित्यसाधून ‘मा. रत्नाकर मतकरी’ यांच्या अध्यक्षतेखाली तेव्हाचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ‘मा. प्रमोद नवलकर’ यांच्या हस्ते या भवनाचे उद्घाटन झाले. साने गुरुजींच्या कुटुंबीयांनी (सुधा बोडा, अरुणाताई शहा आणि इतर) घराची वास्तू महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात दिल्यानंतर शासनातर्फे देखरेख आणि संवर्धनासाठी ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’ कडे ही वास्तू सुपूर्त करण्यात आली आणि या ट्रस्टने ‘साने गुरुजी स्मृतीभवन’ म्हणून ही वास्तू जतन केली आहे.

गुरुजींची कर्मभूमी अंमळनेर असली तरी त्यांच्या जन्मभूमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी पालगड येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव ‘पांडुरंग सदाशिव साने.’ त्यांच्या वडीलांना लोक भाऊराव म्हणत असत. भाऊराव खोत होते; पण खोताचे वैभव त्यांच्याकडे नव्हते. अत्यंत गरिबी होती. ही गरिबी त्यांना फार कष्टी करत असली तरी लोकमान्यांच्या स्वदेशीच्या चळवळीत ते समरस झाले होते. सहा महिन्यांचा तुरुंगवास त्यांनी देशकार्यासाठी भोगला होता. गुरुजींच्या देशभक्तीचे बीज कदाचित त्यांच्या वडिलांचेच असावे.

गुरुजींच्या आईचे नाव ‘यशोदा’ होते. गावात त्यांना ‘बयो’ म्हटले जात असे. त्यांनी दारिद्र्याची खंत कधी बाळगली नाही. उलट प्रेमाने-माणुसकीने, नीती-धर्माने, वात्सल्य-ममतेने कसे वागावे? याच्या त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या. गुरुजींचे भावनाप्रधान, संवेदनशील व्यक्तिमत्व घडवण्यात त्यांच्या आईच्या संस्काराचा खूप मोठा वाटा आहे. ‘श्यामची आई’ या पुस्तकातून गुरुजींनी आपल्या आईच्याच आठवणी सांगितल्या आहेत.

गुरुजींना त्यांची आई आणि वडीलधारी मंडळी ‘पंढरी’ म्हणत असत आणि भावंडे ‘अण्णा.’  गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालगड येथेच झाले. पुढील इंग्रजी शिक्षणासाठी त्यांनी पालगडपासून १८ कि.मी.असणाऱ्या दापोली येथील मिशनच्या शाळेत(आत्ताचे ए.जी.हायस्कूल) प्रवेश घेतला. ते शाळेच्या दिवसात दापोलीतच राहायचे. पण शनिवार, रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी ते चालत पालगडला आपल्या घरी येत असत. (‘श्यामची आई’ ही कादंबरी पालगड, दापोली, लाडघर, हर्णे या परिसरांच्याच पार्श्वभूमीवर रेखाटलेली आहे. ‘माझ्या कोकणची आठवण’ या कवितेतून तर त्यांच्या हृदयात साठलेल्या पालगड आणि दापोलीच्या आठवणी त्यांनी वर्णिल्या आहेत.)

त्यामुळे पालगडच्या स्मृती भवनात त्यांचे घर पूर्वी होते तसेच ठेवून त्यांचे त्या वास्तूशी असलेले जवळचे नाते आणि जीवनपट प्रत्येकाला उमजेल अशा पाट्या लावण्यात आल्या आहेत. स्मृतीभवन शेजारीच गुरुजी ज्या शाळेत शिकले ती शाळा आहे. शाळेत आणि पालगड गावात गुरुजींच्या अनेक आठवणी सामावलेल्या आहेत. त्यामुळे या स्मृतीभवनाला, पुण्यवास्तूला भेट देणे अगदी स्वाभाविक बनते. दापोलीत येणाऱ्या पर्यटकांनी आणि साने गुरुजींना नमन करू इच्छिणाऱ्यांनी या स्मृतीभवनाला जरूर भेट दिली पाहिजे.

संदर्भ:

  • साने गुरुजी जीवन परिचय – यदुनाथ थत्ते
  • परिचित अपरिचित दापोली – प्रा. डॉ. विजय अनंत तोरो
  • साने गुरुजी स्मृतीभवन – पालगड

1 COMMENT

  1. सन्मानीय महोदय, आपल्या पोस्टस नेहमीच माहीती पूर्व असतात. अशाच एका पोस्ट बद्दल मी गेले काही महीने आपल्या नंबरवर पाठपुरावा करत आहे परंतु योग्य प्रतिसाद मिळत नाही.
    आपल्या कडून कारण कळण्यास मार्ग नाही.
    धन्यवाद

Leave a Reply to Anand G Mayekar Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here