रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जोग नदीच्या मुखाशी इतिहासप्रसिद्ध सुवर्ण दुर्ग किल्ल्याजवळ आंजर्ले नावाचे बंदर आहे. दापोली पासून २० किलोमीटर अंतरावर असलेले हे निसर्गरम्य गाव आहे . याच आंजर्ले गावात सुप्रसिद्ध ” कड्यावरचा गणपती” स्थान आहे.
कड्यावरचा गणपती हे आज कोकणातील एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. एके काळी पुलाअभावी द्राविडी प्राणायाम करावा लागणारा प्रवास आज नैसर्गिक विविधतेने नटलेल्या रस्त्याने सुखकारक झाला आहे.
कड्यावरील गणपती मंदिराच्या उगम कथेबाबत अनेक वदंता असल्या तरी त्याचा निर्मिती काळ खात्रीलायकरीत्या सांगणारी कागदपत्रे आज उपलब्द्ध नाहीत. अनेक आख्यायिकांची साक्ष खरी मानल्यास हे मंदिर १२ व्या शतकातील असून पूर्वी संपूर्ण बांधकाम लाकडी असण्याची शक्यता आहे. इ. स. १६३० पासून या देवस्थानाचे व्यवस्थापन “नित्सुरे” घराण्याकडे आले असावे. त्यापूर्वी प्राचीन काळात हे मंदिर समुद्रकिनारी होते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. समुद्रकिनाऱ्यावर “अजयरायलेश्वर” म्हणजे शंकर व सिद्धिविनायक अशी दोन मंदिरे होती.

आता समुद्रपातळी वाढू लागल्याने आंजर्ल्याच्या समुद्रकिनारी क्वचित ओहोटीच्या वेळी अशा जीर्ण जोत्याचे अवशेष दिसून येतात. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे या मंदिराची प्रतिस्थापना नजीकच्या टेकडीवर (म्हणजे कोकणातील भाषेत कड्यावर) करण्यात आली. हा कालखंड इ. स. १७६८ ते १७८० चा असावा. त्या काळात जांभ्या दगडात या आजच्या मंदिराची निर्मिती झाली. त्रिस्तरीय स्वरूपात असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः २०० पायऱ्या चढून जाण्याचे श्रम घ्यावे लागत. परंतु आता मंदिरापर्यंत मोटार नेण्याची सोय करणारा रस्ता झाला आहे.
जीर्णोद्धार करताना काळ्या दगडावर गिलावा देऊन संगमरवरासारखे शुभ्र मंदिर उभारले आहे. आवार विस्तीर्ण असून मध्यभागी गणपती व त्या शेजारी शंकराचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर सुदर्शन तलाव आहे. इ. स. १९८० मध्ये मंदिराचा द्विशताब्दी महोत्सव संपन्न झाला. साधारणपणे ६५ फूट उंच असलेले हे देवालय ५० फूट x ४० फूट क्षेत्रफळाचे आहे. विशेष म्हणजे याची स्थापत्य शैली कालानुरूप मिश्र स्वरूपाची आहे. मध्ययुगीन व अर्वाचीन स्थापत्यकलेचा प्रभाव स्पष्टपणे आढळतो. मंदिरात पुरुषभर उंचीचा दगडी तट आहे. एकूण १६ कळस असणाऱ्या मंदिराचे १६ उपकलश गर्भगृहाच्या वर आहेत. कळसावर अष्टविनायकाच्या प्रतिमा आहेत. सभागृह, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असणाऱ्या या मंदिराच्या एका गोपुराची उंची ४० फूट तर दुसरे गोपुर ६० फूट उंचीवर आहे.
सभागृहाला ८ कमानी आणि घुमटाकृती छत आहे. सर्व घुमटांच्या टोकाशी कमलपुष्पे आहेत. गाभाऱ्यातील गणेश मूर्ती देवता उजव्या सोंडेची असून ५ फूट उंचीची सिंहासनाधिष्ठित आहे. हि मूर्ती काळ्या पाषाणातून घडविलेली आहे. मूर्तीच्या शेजारी रिद्धीसिद्धी यांच्या सुबक आकृत्या कोरलेल्या आहेत. हि मूर्ती दाभोळच्या पठारवाटांनी घडविल्याचे वरिष्ठ नागरिक सांगतात. मंदिरासमोरील तळ्याशेजारी पुरातन बकुळवृक्ष आढळतात. माघी गणेशोत्सव हा येथील महत्वाचा गणेशोत्सव असतो. सुवर्ण दुर्गसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या किल्ल्यासमोरील हे गजाननाचे स्थान सूर्यास्ताच्या वेळी जीवनाचे सार प्रभावीपणे मांडण्यात यशस्वी ठरते.
– प्रवीण कदम