केशवराज मंदिर | दापोली

3
11574

दापोलीहून साधारणपणे ७ कि.मी.वर आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली-हर्णे मार्गावरून जाताना ६ कि.मी.वर आसूद बाग ठिकाण लागते. तेथून उजवीकडे १५ ते २० मिनिटे चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज ( विष्णूचे ) मंदिर आहे. तेथे जाताना सुरुवातीला छोटा नदीचा पूल आहे. हा पूल पूर्वी लाकडी होता; आता सिमेंटचा बांधण्यात आला आहे. मात्र श्री.ना.पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीतून हा पूल अजरामर झालेला आहे. तो ओलांडला की वरच्या कड्यावर असणाऱ्या केशवराजपर्यंत पोहचण्याचा जो रस्ता आहे त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. नारळ, पोफळी, आंबा, काजू, इ. वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्षांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरायला लावणारे आहे. चढ असली तरी तिथे अजिबात थकवा येत नाही. एक विलक्षण मनःशांती लाभते.

गर्द झाडीत वसलेलं हे मंदिर साधारण १००० वर्षे जुने आहे. या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे. देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे. तेथून १२ महिने पाणी वाहत असते. गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक झरा आहे व तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूला गरुड आहे. मंदिरातील विष्णूमूर्ती तर फारच सुंदर आहे. या विष्णूमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म अशी चार आयुधे आहेत.

हे देऊळ पांडवांनी एका रात्रीच बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते. हे मंदीर गावापासून एका बाजूला आहे. सर्वसाधारणपणे विष्णू-विष्णुपत्नी लक्ष्मी यांची देवळे मुख्य वस्तीत असतात आणि शंकराची मंदिरे एकाकी, गावाबाहेर, निर्जन ठिकाणी असतात. परंतु केशवराज मंदिर हे या गोष्टीस अपवाद आहे.

या ठिकाणी कार्तिक महिन्याच्या पहिल्या एकादशीपासून उत्सव सुरु होतो, तो त्यानंतर सुमारे ५ दिवस चालू असतो. पौर्णिमेच्या दिवशी प्रसाद असतो. दुसऱ्या एकादशीपासून ३ दिवस उत्सव असतो तर त्रयोदशीला प्रसाद असतो. देवधर, दीक्षित, ढमढेरे, दातार, दांडेकर, आगरकर, गांगल यांचे केशवराज कुलदैवत आहे.

याशिवाय आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या परिसराला डोळ्यासमोर ठेवून श्री.ना.पेंडसे या महान लेखकाने ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी लिहली तो हाच परिसर होय. गारंबीचा बापू या चित्रपटात लाकडी पुलापासून ते नारळी-पोफळींच्या बागांपर्यंतचे चित्रीकरणदेखील या परिसरातले आहे. दापोलीला येणारा पर्यटक येथे आवर्जून भेट देतो.

संदर्भ: 

  • समग्र कोकण दर्शन – श्रीनिवास घैसास
  • परिचित अपरिचित दापोली तालुका – प्रा. डॉ. विजय तोरो


3 COMMENTS

  1. Mahabharat 5000 varshanpurvi ghadale. Tumhi dilelya mahitinusar Keshraj mandir 1000 varshanpurvi bandhale gele. Yacha artha asa hoto kaa ki Pandav 1000 varshanpurviparyant hayaat hote ?

    • नमस्कार.

      केशवराज मंदिर हे साधारण १००० वर्षे जुने आहे आणि हे देऊळ पांडवांनी एका रात्रीच बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते.
      कोकणात अश्या बऱ्याच आख्यायिका प्रसिद्ध आहेत आणि त्यातील ही एक आहे. अश्या आख्यायिका आम्ही आपल्या समोर आणतो आणि त्याबद्दल अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला या संबंधित अधिक माहिती मिळाल्यास आम्हाला जरूर संपर्क करा.

      टीम तालुका दापोली

  2. Tumche uttar manala na patanare aahe. Keshavraj hay mandir jar Pandavani bandhalele asel tar tay 5000 varshanpurvi asel 1000 varshanpurvi naahi.
    Jar 1000 varshanpurvi bandhale gele asel tar tay Pandavani navhe dusarya koni asamine bandhale asech anuman lavta yete.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here