शाही मशीद, दाभोळ

0
4824

कोकणामध्ये सोळाव्या शतकात म्हणजे आदिलशाही राजवटीत निर्माण झालेल्या मशीद म्हणून दोन मशिदींचा उल्लेख इतिहासात आढळतो. यातील एक म्हणजे चौलची हसाबा मशीद आणि दुसरी दापोलीत दाभोळ धक्क्यावर असलेली शाही मशीद. या मशिदीचा अंडा मशीद किंवा मासाहेबा मशीद म्हणूनही उल्लेख केला जातो.

आज या मशिदीची इमारत प्रचंड दुर्लक्षित आणि भग्नावस्थेत आहे. ही मशीद म्हणजे विजापूर येथील शाही जामा मशिदीची प्रतिकृती मानली जाते. इराणी शैलीच्या या मशिदीची बांधणी अतिशय रेखीव व प्रमाणबद्ध आहे. या वास्तूत प्रवेश करण्यासाठी प्रशस्त, सुंदर काळ्या दगडाच्या पायऱ्या आहेत. त्या चढून गेल्यावर शुचिर्भूत होण्यासाठी हौद व कारंज्याची व्यवस्था आहे. मशिदीच्या दर्शनी भागात तीन भव्य कमानी, छ्तालागत हस्तांच्या जोडणीने तयार झालेल्या छज्जा व चारही कोपऱ्यावर अतिशय प्रमाणबद्ध मनोरे आहेत. जमिनीलगत मनोऱ्यावर दगडात कोरलेले साधे पण मनोवेधक नक्षीकाम आहे. छज्जाच्या मध्यभागावर छोटे छत्रीवजा घुमट व त्याच्या पाठीमागे मशिदीचा ७५’ उंचीचा भव्य घुमट आहे. घुमटावर पूर्वी सोनेरी पत्रा असल्याचे सांगितले जाते.

कथा १:

इ.स.१६५९ मध्ये विजापूरची राजकन्या आयेषाबीबी मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली. हवामान ठीक नसल्याने पुढला प्रवास होऊ शकला नाही. तिच्यासोबत २०,००० घोडेस्वार व इतर लवाजमा होता. प्रवास रद्द झाल्याचे निश्चित कळल्यावर काय करावे या विवंचनेत असताना सोबत असलेल्या काझी व मौलवीने धन धार्मिक कार्यासाठी वापरावे असा सल्ला दिला. आयेषाबीबीने त्यानुसार ही मशीद बांधायचे काम हाती घेतले. ते चार वर्षे चालले. कामीलखान नामक शिल्पकाराने ही मशीद बांधली. त्यावेळेस १५ लाख रुपये खर्च आल्याची नोंद आहे.

कथा २:

दुसऱ्या एका कथेनुसार सदर शहजादीला ऋतुदर्शन होईना म्हणून मक्केला जाण्यासाठी ती दाभोळ बंदरात आली. दोनचार दिवसानी ती निघणार तो ऋतू आला मग त्या मक्कावारीसाठी खर्च होण्याच्या पैशातून तिने ही भव्य मशीद बांधली.

कथा ३:

तिसरी कथा म्हणजे एका फकिराने त्याच्याकडील एका अंड्यातून जन्मलेल्या एका कोंबडीपासून उत्पन्न झालेल्या अनेक कोंबड्या विकून ही मशीद उभारली. त्यामुळेच या मशिदीला अंडा मशीद असे नाव पडले. या मशिदीचे बांधकाम १५५९ मध्ये सुरु झाले व १५६३ मध्ये पूर्ण झाले अशीही एक इतिहास नोंद सापडते.

वास्तविक ही मशीद कोकण किनाऱ्यावरील सुस्थितीत असलेली आदिलशाही काळातील एकमेव इमारत आहे. मुघल स्थापत्यशैलीचा अप्रतिम नमुना आहे. दाभोळ आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वपूर्ण वास्तू आहे.

Ratnagiri District Gazitter
Old edition
Page no.331 Foot Note 2
Inscription from Dabhol Mosque
In the name of god, the just the merciful verily Mergues belong to God, so be not co-shares with him. The rival of this Mergues in colour does not exist in world. The best of well born Governers Pir Ahmad (built this Mergue) in the year 1059 (A.D.1649) of the Hijra of the prophet on whom be peace and blessings

संदर्भ:
• अण्णा शिरगावकर – शोध अपरान्ताचा
• प्रा.डॉ. विजय तोरो – परिचित अपरिचित दापोली
• अब्दुल कादिर मुकादम – कोकण: विविध दिशा आणि दर्शन यातील शोधनिबंध
• https://www.facebook.com/pages/Shahi-Masjid-Dabhol/392973337435154
• https://en.wikipedia.org/wiki/Dabhol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here