कोकणच्या ७२० कि.मी.लांबीच्या किनारपट्टीवर महाराष्ट्राचे वैभव म्हणून अनेक जलदुर्ग उभे आहेत. त्या जलदुर्गांपैकी एक प्रमुख जलदुर्ग म्हणजे हर्णैचा ”सुवर्णदुर्ग”. या किल्ल्याचा इतिहास थेट शिलाहारांपासून सुरु होतो, असे म्हटले जाते. परंतु या म्हणण्याला पुष्टी देणारे निश्चित असे पुरावे उपलब्ध नाहीत. ज्ञात माहितीनुसार हा किल्ला सोळाव्या शतकात आदिलशाही राजवटीत बांधला गेला असावा, असा अंदाज वर्तविला जातो. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्या अली आदिलशहाचा पराभव करून हा किल्ला स्वराज्यास जोडला, तेव्हा या किल्ल्याची फेरबांधणी केली व किल्ला अतिशय बळकट बनवला.
हा किल्ला साधारणतः आठ एकर जागेत पसरलेला आहे. समुद्रसपाटीच्या पातळीवर अगदी सपाट अशा खडकावर मधल्या उंचवट्याचा खडक तासून, त्याच्या माथ्यावर दगडी चिरे बसवून हा किल्ला बांधलेला आहे. अखंड तटबंदी बांधलेल्या या किल्ल्यास खूप बुरुज व फक्त दोन दरवाजे आहेत. मुख्य दरवाजा पूर्व दिशेस आहे; परंतु पूर्व दिशेस असला तरी तो उत्तराभिमुख आहे. या दरवाजाचे दर्शन किल्ल्याच्या अगदी जवळ गेल्याशिवाय होत नाही. दरवाज्याकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या जिथे सुरू होतात तिथे वाळूची पुळण आहे. या पुळणमध्ये मोडून पडलेल्या जुन्या तोफा आहेत. द्वाराच्या उजव्या तटावर डोक्यावर शेपटी घेतलेल्या युद्ध मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे. उंबऱ्याच्या अलीकडच्या पायरीवर कासव कोरलेले आणि दारावर गोमुख आहे. दरवाजाच्या आतील बाजूस दोन्ही बाजूला रक्षक खोल्या आहेत. डाव्या बाजूच्या तटाजवळ विहीर आहे. तेथून पुढे आल्यावर वाड्याचे अवशेष व दोन कोठारे आहेत.
किल्ल्यावर झाडेझुडपे व गवत फार वाढलेले असल्यामुळे किल्ल्याचे बरेचसे अवशेष झाकून गेले आहेत. किल्ल्याच्या नैऋत्य बाजूस अरुंद होत गेलेला एक भाग आहे. तेथून कनकदुर्ग अतिशय उत्तम दिसतो. कनकदुर्ग,फत्तेगड व गोवा किल्ला हे तीन किल्ले सुवर्णदुर्गाच्या रक्षणार्थ बांधले गेलेले. पश्चिमेस गडाचा दुसरा दरवाजा आहे. खरंतर तो वायव्य दिशेस आहे. हा गडाचा चोर दरवाजा आहे. तेथे उतरण्यासाठी तटामध्ये उत्तम अशा पायर्या बांधलेल्या आहेत. गडाच्या काही बुरुजांमध्ये व बुरुजालगत खोल्यांचे बांधकाम दिसते. बहुदा ती शस्त्रागृहे किंवा धान्य कोठारे असावीत. याशिवाय पडके चौधरे, पाण्याचे हौद व इतर काही अवशेष आढळतात. मात्र मंदिर किंवा मंदिराचे अवशेष किल्ल्यावर आढळत नाहीत. या मागचा संदर्भ इतिहासात शोधल्यावर असे समोर येते की, सरखेल कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी सुवर्णदुर्गवरून हलवून अलिबागच्या हिराकोट मध्ये प्रस्थापित केली होती.
सुवर्णदुर्गाचा इतिहास पाहिल्यास त्यातील मोठा काळ आंग्रे घराण्याशी जोडलेला आहे, असे दिसून येते. सरखेल कान्होजी आंग्रेंचे आजोबा सेखोजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाची तटबंदी बांधण्याचे काम केले, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांत आढळतो. कान्होजी आंग्रेंचे वडील तुकोजी आंग्रे शिवरायांच्या काळात सुवर्णदुर्ग किल्ल्यात सरनोबत म्हणजे उपसेनापती होते. कान्होजींचा जन्म सुवर्णदुर्ग किल्ल्यावर झाला. सागरी युद्धकलेचे व युद्धनीतीचे धडे त्यांनी सुवर्णदुर्गाच्या परिसरातच गिरवले. १६८८ साली मोगल सरदार सिद्दी कासीमने सुवर्णदुर्गास वेढा घातला होता. सुवर्णदुर्गाचा किल्लेदार अचलोजी मोहिते किल्ल्यावरची रसद व दारूगोळा संपत आल्यामुळे मोगलांना फितूर झाला. किल्लेदार पैसे घेऊन सुवर्णदुर्ग सिद्धयाच्या ताब्यात देणार अशी हमखास खबर बाळाजी विश्वनाथांना लागली. त्यांनी ती कोळ्यांच्या मार्फत कान्होजींना कळवली. त्यावेळेस कान्होजी अवघे वीस-बावीस वर्षांचे होते. त्यांनी त्याच रात्री गडावरील सहकाऱ्यांना एकत्र केले व अचलोजी मोहितेला कैदेत टाकले, इतर फितुरांनाही वेचून मारले आणि किल्ल्याबाहेर पडून सरळ मोगलांवर हल्ला चढवला. परंतु हल्ला फसला व ते आणि त्यांचे सहकारी मोगलांच्या कैदेत पडले. मोगलांच्या कैदेतून शिताफिने निसटून ते पुन्हा सुवर्णदुर्गावर आले. गड पुन्हा बऱ्याच कालावधीपर्यंत त्यांनी झुंजत ठेवला.
अखेर मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्याने वेढा उचलला. या घटनेमुळे त्यावेळचे मराठे राजे राजाराम महाराज यांनी कान्होजींना “ सरखेल” पदवी देऊन आरमाराअधिपती केले. पुढे त्यांच्या मृत्युपर्यंत म्हणजे १७२९ पर्यंत किल्ला कान्होजींच्याच ताब्यात होता.(अर्थात मराठा राजांच्यावतीने कान्होजी ही जबाबदारी सांभाळीत होते. शिवाजी महाराजांनानंतर राजाराम महारांजाकडे इ.स.१७०० पर्यंत व नंतर ताराराणीकडे 1714 पर्यंत सुवर्णदुर्ग होता. कान्होजींनी ताराराणीचा पक्ष सोडल्यामुळे १७१४ पासून तो शाहू महाराजांकडे गेला.) कान्होजींच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा “ संभाजी आंग्रे” यांनी गड सांभाळला. संभाजींच्या पश्चात त्यांचा सावत्र भाऊ “ तुळाजी आंग्रे” यांनी सुवर्णदुर्गाचा ताबा घेतला. तुळाजी आंग्रे हे पराक्रमी व स्वतंत्र वृत्तीचे होते. छत्रपतींच्या वतीने राज्य कारभार पाहणाऱ्या पेशव्यांनाही ते जुमेनासे झाले. त्यांचा वाढता प्रभाव दडपून टाकण्यासाठी पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने सुवर्णदुर्गावर हल्ला करायचे ठरवले. २२ मार्च १७५५ रोजी पेशवे – इंग्रज तहानुसार तुळाजींवर स्वारी करण्यासाठी प्रोटेक्टर जहाजावरच्या ४४ तोफा,१६ तोफांचे दुसरे जहाज, दोन युद्धनौका, चौलच्या खाडीशी ७ गुराब, ६० गलबत आणि दहा हजारांच नौदल घेऊन बाहेर पडले. पहिला मुक्काम कुंभाऱ्याला आणि दुसरा मुक्काम सुवर्णदुर्गाच्या उत्तरेला २०-२२ की.मी. वर पडला. तिथून रामाजीपंत हे मराठा सरदार जमिनीवरून सुवर्णदुर्गाच्या दिशेने सरकू लागले.
सुवर्णदुर्गाच्या आश्रयानं हर्णैच्या बंदरात नांगरून ठेवलेल्या तुळाजींच्या आरमारावर कमोडर जेम्सने हल्ला चढवला’( कमोडर जेम्स म्हणजेच ब्रिटिश कमांडर विल्यम जेम्स. हा इंग्रजी सैन्याचा प्रमुख होता.) पण ही बातमी आंग्रेंना आधीच कळल्याने त्यांचे आरमार दक्षिणेस पळाले. आंगऱ्यांच्या आरमारामागे “प्रोटेक्टर” नेच काय तो पाठलाग केला; पण शेवटी तोही परत आला. पण लगेचच सुवर्णदुर्गावर हल्ला करायचे इंग्रजांनी ठरवले आणि तोफांद्वारे किल्ल्यावर अग्निगोलकांचा मारा सुरू केला. पश्चिमेकडून मारा अचूक ठरेना, तेव्हा ईशान्येकडून हल्ला चढविला. तिथला बुरुज ढासळला. पडलेल्या खिंडारातून आज घुसलेल्या अग्निगोलकांमुळे किल्ल्यावरच्या झोपड्या, कोठारांनी पेट घेतला. त्याच वेळेस प्रोटेक्टर जहाजावरून गोवा किल्ल्यावर चढवलेला तोफगोळ्यांचाही हल्ला यशस्वी ठरला. गोवा किल्ला ताब्यात आल्यामुळे तोफांच्या छत्राखाली काही सैनिक सुवर्णदुर्गाच्या खालच्या सपाट कातळावर उतरवणेही जमून गेले.
तिथे उतरलेल्या सैनिकांनी अक्षरशः कुऱ्हाडी घालून सुवर्णदुर्गाचा दरवाजा फोडला. ६ एप्रिल १७५५ रोजी फत्तेगड, कनकदुर्ग किल्लाही पेशव्यांच्या फौजेने जिंकला. यशस्वी झालेला कमोडर जेम्स ८ एप्रिल रोजी बाणकोटकडे मार्गस्थ झाला. ११ एप्रिल रोजी ब्रिटिशांनी तहानुसार इंग्रजांनी किल्ला पेशव्यांकडे सोपविला. ब्रिटिश संमतीने रामजी महादेव यांस सुवर्णदुर्गाचे अधिकारी म्हणून नेमण्यात आले. पण लढाई जिंकण्याचे श्रेय ब्रिटिश कमांडर जेम्सला जाते. ब्रिटिश राजवटीच्या दृष्टीने या विजयाचे भविष्यात फार चांगले परिणाम झाले. रामजी महादेव यांच्या मृत्यूनंतर हरिपंत फडके सुवर्णदुर्गाचा किल्लेदार होते.
कनकदुर्गाची माहिती – https://talukadapoli.com/places/kanakdurg-harnai/
गोवा किल्ल्याबद्दल माहिती – https://talukadapoli.com/places/goa-fort-harnai/
पुढे १८०२ साली यशवंतराव होळकरांच्या भयाने दुसरा बाजीराव कुटुंबकबिल्यासहीत पुण्याहून सुवर्णदुर्गाच्या आश्रयाला आला आणि काही दिवसांनी कुटुंब सोडून एकटाच वसईला इंग्रजांच्या आश्रयाला निघून गेला. १८०४ साली एक मराठा सरदाराने कब्जात आणलेला सुवर्णदुर्ग इंग्रजांनी परत जिंकून पेशव्यांच्या स्वाधीन केला. त्यावेळी ८०० अरब व मुसलमानांची शिबंदी मराठा सरदाराच्या हाताखाली होती.
नोव्हेंबर १८१८ मध्ये कर्नल केनेडी सुवर्णदुर्ग घेण्यासाठी आला होता. त्यावेळेस कॅप्टन कॅम्बेल व लेफ्टनंट डॉमिनिसेटी यांनी अवघ्या ५० शिपाई व ३० खलाशांसह या किल्ल्यावर हल्ला चढवला. तोफांच्या भडीमाराला तोंड देऊन ही मंडळी शिड्या लावून तटावर चढली व त्यांनी शिबंदीकडून किल्ल्याचा ताबा घेतला. सन १८१८ पासून स्वातंत्र्यापर्यंत किल्ला ब्रिटिशांच्याच ताब्यात होता.
सुवर्णदुर्ग जिंकल्यानंतर कमोडर जेम्सने त्याच्याबरोबरचे सर्व सैन्य कलकत्त्याला कर्नल रॉबर्ट क्लाइव्ह यांच्याकडे पाठविले. त्यावेळेस क्लाइव्ह प्लासीच्या लढाईची तयारी करत होता. प्लासीची लढाई कलकत्त्यापासून सुमारे १५० कि.मी दूर भागीरथी नदीच्या तीरावरील “ पलाशी” या ठिकाणी झाली. पलाशी त्यावेळी बंगालचा नवाब सिराजउद्दौला याची राजधानी होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजउद्दौला यांच्यात पलाशी येथे घमासान लढाई झाली. सिराजउद्दौलाला फ्रेंचांनी मदत केली. परंतु रॉबर्ट क्लाइव्हच्या धूर्त चालीने ही लढाई इंग्रजांनी जिंकली. लढाई जिंकण्याची तारीख होती २३ जून १७५७. इंग्रजांनी भारतात जिंकलेली ही पहिली मोठी लढाई होती. त्यामुळे पूर्ण बंगाल प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यात आला. या क्षणापासून ब्रिटिशांनी भारतात अधिकृतरित्या राज्य सुरू केले.
१७२० साली अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या जेम्स या युवकाने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी घर सोडले आणि समुद्राच्या आश्रयाला गेला. तेथेच तो नाविक दलात सामील झाला. वयाच्या १८ व्या वर्षी जेम्स एक जहाज घेऊन इंग्लंडला जात असताना सागरी मोहिमेत स्पॅनिश लोकांनी त्याला पकडले आणि शिक्षा म्हणून पुन्हा समुद्रात सोडले. त्यानंतर जेम्सने १७४७ साली ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी धरली. त्याला व्यापारी जहाजांच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती. त्याकाळी समुद्रात असणारे चाचे या मालवाहू बोटींची लूट करीत असत. या चाच्यांना रोखण्याचे प्रयत्न अनेकांनी करून पाहिले; पण त्यात कोणीच यशस्वी झाले नव्हते. हीच महत्त्वाची जबाबदारी जेम्सने स्वीकारली आणि त्याने बॉम्बे प्लीट नावाची तुकडी भारताच्या किनारपट्टीवर उभी केली.
त्यामध्ये तब्बल ४४ तोफा असलेले ‘प्रोटेक्टर’ नावाचे जहाज सोबत घेतले व समुद्री चाच्यांचा पाडाव करायला जेम्स सज्ज झाला. या चाच्यांमध्ये कोकण किनारपट्टीवर तुळाजी आंग्रे यांच्या एका तुकडीचा समावेश होता. हर्णैजवळ असणाऱ्या सुवर्णदुर्गाच्या आश्रयाने मराठ्यांची ही तुकडी ईस्ट इंडिया कंपनीच्या मालवाहू जहाजांना लक्ष करून लूट करत असे. या गोष्टीचा बीमोड करण्यासाठी जेम्सने थेट सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला व आपले नाविक दल, तोफखाना यांचा पुरेपूर वापर करत १७५५ साली जेम्सने सुवर्णदुर्ग ताब्यात घेतला.
सुवर्णदुर्गाच्या विजयामुळे त्याला भरपूर मानसन्मान आणि संपत्ती मिळाली. सन १७५९ मध्ये जेम्स इंग्लंडला परतला. तेव्हा तो आपली पत्नी अँन गोगार्ड आणि दोन मुलांसह सोहा परागण्यातल्या गेराड स्ट्रीटवर राहत असे. तो ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळात सामील झाला. कॉर्नवॉलमधून ब्रिटिश संसदेवरही निवडून आला. १७७८ साली ब्रिटीश सरकारची सर ही बहुमानाची पदवी त्याला प्राप्त झाली. पण लंडनमधील वास्तव्यात जेम्स सुवर्णदुर्गाला मात्र विसरला नाही. त्याला या किल्ल्यात राहायचे होते. त्याचे हे स्वप्न अधूरे राहिले कारण १७८३ मध्ये जेम्सचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
पण आपल्या पतीची स्मृती जतन करण्यासाठी व सुवर्णदुर्गाची आठवण कायमस्वरुपी रहावी यासाठी जेम्सच्या पत्नीने लंडन शहराच्या अग्नेय दिशेला असलेल्या शुटर्स हिलवर सुवर्णदुर्गाची प्रतिकृती असलेल्या एका इमारतीचे बांधकाम करून घेतले. २ एप्रिल १७८४ सदर बांधकामाला सुरुवात झाली. सुवर्णदुर्ग किल्ल्याचा ज्याप्रकारे त्रिकोणी आकार, तब्बल ६३ फुट उंचीची तटबंदी व बांधकाम आहे तसेच बांधकाम करण्यात आले; पण गॉर्थिक शैलीमध्ये. आणि या इमारतीला सुवर्णदुर्गाच्या आठवणींसाठी सेव्हर्नद्रुग कॅसल असे नावही देण्यात आले. २०१६ मध्ये सेव्हर्नद्रुग कॅसलने इंग्लंडमधील वारसाहक्क श्रेणीत मिळवल्या जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या २१ इमारतींमध्ये स्थान मिळवले आहे.
संदर्भ :
परिचित अपरिचित दापोली – प्रा.डॉ.विजय अनंत तोरो
दै,रत्नागिरी टाइम्स (बुधवार दि.१७ फेब्रुवारी २०१६)
जलदुर्गांच्या सहवासात – प्र.के.घाणेकर
दुर्गकथा – निनाद बेडेकर
milindjamdar.blogspot.com/p/blog-page_18.html?m=1
सुवर्णदुर्ग किल्यावर जाण्यासाठी काही विशेष सुविधा उपलब्ध आहेत का? किंवा तेथील मासेमारीसाठी जाणारे लोक किल्ला फिरवण्यासाठी मदत करतात का.
किल्ल्यावर जाण्यासाठी सतत बोटी असतात. तिथले स्थानिक कोळी बांधव नक्कीच तुम्हाला मदत करतील.
सुवर्ण दुर्गाची सहलच घडवली. दापोली उत्तम लेखन माझ्या भ्रमंती साठी एक ठिकाणांची नोंद झाली.