कोकणात मंदिरांची संख्या अगणित आहे. पण या अगणित संख्येत मोठी संख्या पहिली तर ती आहे शिवालयांची. अगदी डोंगर माथ्यापासून समुद्र सपाटीपर्यंत समाधिस्त शिवाची लिंगस्वरूप मंदिर आढळतात. यातील कितीतरी स्थानं स्वयंभू आहेत. प्रत्येक स्थानाशी जोडलेल्या वेगवेगळ्या भरपूर अशा आख्यायिका व दंतकथा आहेत. परंतु यातील मूलभूत सत्य एकच; यातील बरीचशी स्थानं अतिप्राचीन आहेत. त्यांचा काळ कदाचित संशोधकच शोधू शकतील किंवा आख्यायिकांवरच आपल्याला समाधान मानव लागेल.
दापोली तालुक्यातील लाडघरच्या तामस्तीर्थाजवळ असलेलं असच एक शिवालय म्हणजे ‘वेळेश्वर मंदिर’. खरंतर हे मंदिर बाजूच्या करजगावच्या हद्दीत येत पण लाडघर समुद्रकिनारा अगदी बाजूलाच असल्याने “लाडघरचे वेळेश्वर मंदिर” अशी ओळख जास्त वाचायला व ऐकायला मिळते.
हे मंदिर अतिशय म्हणजे अतिशय प्राचीन आहे हे तुम्हाला पाहताक्षणीच कळून चुकेल. या मंदिराचं जोतं चांगलं पुरुषभर उंच, विस्तीर्ण आणि संपूर्ण भक्कम अशा काळ्या दगडाचं आहे. वरील कळसापर्यंतची उभारणीहि अतिशय सुबकतेची आहे. तेथील ग्रामस्थ हे मंदिर पांडवकालीन आहे असं सांगतात.
पूर्वी ह्या देवळाच्या जागी मोकळी जमीन होती. तिथे पुष्कळ गवत वाढलेलं असायचं. तेव्हा एक गुराखी आपल्या गायी बैलांना चरण्यासाठी घेऊन येत असे. तिथे एक गाय आपली वाट वाकडी करून गुराख्याच्या गायींबरोबर येत असे. अनेक दिवस ह्या गायीचा दिनक्रम पाहून एक दिवस गुराखी गायीच्या मागोमाग आला. गुराख्याने पहिले कि हि गाय दररोज येऊन रानात असलेल्या शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करते आणि समोर लाडघरच्या समुद्रात असलेल्या पाषाणामागे निघून जाते. मग हि गोष्ट त्याने तिथे असलेल्या गाईच्या मालकास सांगितली आणि म्हंटल ‘तुमची गाय रोज वाट वाकडी करून माझ्या गाईंबरोबर चरायला येते म्हणून तुम्ही मला ह्याबद्दलचा मोबदला द्यायला हवा’.
ह्यावर त्या व्यक्तीने शेरभर लाह्या गुराख्याच्या घोंगडीत ओतल्या. गुराख्याला हा मोबदला अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही म्हणून घरी परतताना घोंगडीतल्या त्या लाह्या समुद्रकिनारी झटकल्या आणि घरी पोचल्यावर पाहतो तर काय घोंगडीला चिटकून राहिलेल्या लाह्यांच्या मोहरा झालेल्या. त्यानंतर गाईच वाट वाकड करून येणंही बंद झालं. अशा प्रकारची हि दंतकथा येथे सांगितली जाते. शिवाय ज्या लहान मुलांना वेळा लागतात (वेळा म्हणजे हातपाय बारीक होऊन तिरपे होणे, पोट वाढणे, शरीर एक्दम बारीक होत जाणे) अशी लहान मुलं या मंदिरातील तीर्थ घेतल्याने एकदम निरोगी आणि व्यवस्थित होतात अस सांगितलं जात. वेळा घालवतो म्हणून वेळेश्वर असही म्हणण्यात येत.
१८८५ पासून या मंदिराला पेशव्यांची सनद येते. हि सनद अगदी निरंकार चालणारी आहे, तिची मामलेदार कचेरीत तशी नोंद आहे. अजूनही बरेच ऐतिहासिक धागे ह्या मंदिराची जोडलेले आहेत. त्यामुळे खरं पाहायच झालं तर हि अशी मंदीर आपलं प्राचीन वैभव आहे. आणि हे वैभव व्यवस्थित जतन झाल पाहिजे, कायम टिकलं पाहिजे.








