दापोली तालुक्यातील प्रसिद्ध असे हे ‘केळशीचे महालक्ष्मी मंदिर’
हे मंदिर केळशी गावापासून ३ किमी अंतरावर आहे. नव्या महसूल रचनेनुसार हे देऊळ उटबंर गावात येते; पण पुर्वीपार ‘केळशीचे महलक्ष्मी मंदिर’ म्हणून ख्याती असल्यामुळे आजही तसेच म्हटले जाते. या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे.
या स्वयंभू मूर्तीमागची अख्यायिका अशी की, एक शेतकरी जमीन नांगरत असताना नांगराचा फाळ अडकला व फाळ अडकलेल्या ठिकाणी लाल रक्तासारखे पाणी येऊ लागले. त्या शेतकऱ्याने तेथे उत्खनन केले आणि श्री महालक्ष्मीची स्वयंभू मूर्ती त्याला प्राप्त झाली. पुढे लक्ष्मण लागू नावाच्या ब्राह्मणाने देवीचे अतिशय सुंदर असे हे मंदिर उभारले.
या मंदिराला वर दोन घुमट आहेत आणि हे घुमट उभे नसून गोल आहेत. पूर्वी मलेच्छांच्या स्वाऱ्या होत असल्यामुळे लांबून मशीद भासेल, असे घुमट तयार करण्यात आले. आतील मंदिराचा घुमट मात्र उभा आहे. मंदिराला तीन दरवाजे असून सभोवताली विस्तीर्ण जागा आहे. पाठीमागच्या तळ्यात तर छान कमळाची फुले फुललेली दिसतात. चैत्रशुद्ध अष्टमी ते चैत्र पौर्णिमा मंदिरात खूप मोठा उत्सव असतो. चैत्र पौर्णिमेला देवीची जत्रा असते. या जत्रेला साधारणत ३०००-४००० लोकांची गर्दी असते. ही जत्रा अगदी जुन्या गावगाड्याप्रमाणे चालते. प्रत्येक जातिसमाजाचे मान असतात, प्रत्येक समाजाला विशिष्ठ कामे असतात. सध्या मंदिराचे व्यवस्थापन १९६० साली स्थापन झालेल्या ट्रस्टच्या हाती आहे. त्याआधी गावात ज्याना कारभारी म्हंटले जात असे, ते लोक मंदिराची व्यवस्था पाहत असत.
केळशी गावच्या लोकांची या महालक्ष्मीवर अपार श्रद्धा आहे. गावाप्रमाणे संपूर्ण तालुक्यावर देवीचा वरदहस्त आहे, असे ते मानतात. इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही उत्तम आहे आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे.