हर्णे बंदर येथील मासे लिलाव

0
401

‘हर्णे बंदर’ हे दापोली तालुक्यातील प्रसिद्ध असे बंदर आहे. या बंदरावर कनकदुर्ग, गोवा किल्ला, फत्तेगड हे भुई किल्ले तर ‘सुवर्णदुर्ग’ हा जलदुर्ग आहे. या किल्ल्यांवर पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमार विसावलेले होते. या भागात कोळी लोकांची मोठी वस्ती आहे त्यामुळे इथला मुख्य व्यवसाय आहे मासेमारी.

आज शेकडो यांत्रिक नौका, लॉचेस, छोट्या-मोठ्या होड्या आपल्याला येथे पाहायला मिळतात. सुमारे ५०० मच्छीमारी नौका, छोट्या होड्या, मचवे, बर्फाची ने-आण करणारी वाहने, डिझेलचे कॅन्स, मासेवाहू ट्रक्स, वजनकाटे, ट्रे, टोपल्या, बैलगाड्या आणि हजारो माणसे यांनी समुद्रकिनारा भरलेला दिसतो. इतका की पाय ठेवायलासुध्दा जागा नसते. हे दृश्य असतं दुपारी तीन ते सहा यावेळेत. पहाटे आणि सकाळचे काही प्रहर मात्र शुकशुकाट असतो. हर्णे, दाभोळ, वेलदूर, नवनगर आणि अगदी रत्नागिरी ते बाणकोट परिसरातील मासेमारी नौका दुपारच्या वेळेस एकेक करून बंदरात दाखल होऊ लागतात. पहाटे मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी परतात. त्याच बरोबर दोन-दोन,चार-चार दिवस समुद्रात राहून मच्छीमारी करणाऱ्या नौकाही परततात. नौकेतून आणलेला माल (मासे)  वाळूत पसरून बाजाराला (लिलावाला) सुरुवात होते. हा बाजार पाहिल्यावर तुम्ही अक्षरशः आश्चर्यचकित होता आणि नशिबाच्या जोरावर केलेले लाखो रुपयांचे व्यवहार पाहून डोळे विस्फारून जातात. कारण इथे ‘ज्याचा माल त्याची किंमत आणि ज्यांची जास्त किंमत त्याचा माल.’ हातात फडफडणाऱ्या नोटा घेऊन, एकमेकावर कुरघोडी करून खरेदीदार बोली बोलत असतो आणि विक्रेता गराड्याच्यामधे उभा राहून बोली वाढवत असतो. लिलाव जिंकणाऱ्याला ताबडतोब रोख रक्कम अदा करून वाळूतला ढीग ताब्यात घ्यावा लागतो.

या बाजाराचं स्वरूप तसं शिस्तबद्ध नाही किंवा त्याला कोणतेही मापदंड लागू नाहीत.फक्त किनाऱ्यावर त्या-त्या प्रकारच्या मासळीच्या जागा ठरलेल्या आहेत. म्हणजे अगदी बंदरालगत कोळंबीचे लिलाव चालतात, तर जरा पुढे गेल्यावर पापलेटचे लिलाव पहायला मिळतात, सर्वात पुढे काटेरी स्वस्त माशांच्या टोपलीची खरेदी-विक्री होत असते. इथे छोटी कोळंबी,  मोठी कोळंबी, शेवंड, लॉब्स्टर, पापलेट सुरमई, बांगडा, सौंदाळे, मांदेली, करली, पेडवे, हैद, कानिट, म्हाकुळ, वाघुळ, वाटू, शिंगटा, लेप  असे इत्यादी प्रकारचे मासे मिळतात. कोळंबीला चांगले बाजारमूल्य असल्यामुळे तिची खराब होण्यापासून योग्य ती काळजी घेतली जाते. टायगर प्रॉन्स, व्हाईट प्रॉन्स  किंवा कापशी कोळंबी सर्वात महाग असते. कोळंबीच्या गटातील सर्वात महाग मासा म्हणजे शेवंड किंवा लॉबस्टर. शेवंडचा खप  मच्छिमाराला चांगला नफा मिळवून देतो.

इथे छोटे व्यापारी, फेरी व्यवसाय करणाऱ्या कोळणी, दर्दी खवय्ये आणि रत्नागिरीच्या कारखान्यांना, मुंबई मार्केटला मासळी पुरवणारे लोक मोठ्या गर्दीने हजर असतात. लिलावात खरेदी केलेला माल थेट मुंबईत कुलाबा मार्केटकडे जातो. तसाच तो रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर इकडेही पाठविला जातो. लिलावात पैसा ओतरणारे मुंबईचे व्यापारी आणि भैये यांची लगबग दिवसेंदिवस  किनाऱ्यावर वाढत आहे; पण तरी स्थानिकांची संख्या लक्षणीय आहे. स्वतःची फिशिंग यंत्रणा असणारे ट्रौलर मालक माल लिलावात न काढता  थेट आपल्या वाहनातून कारखान्यांकडे किंवा कलेक्शन सेंटर कडे नेतात. अनेक मत्स्य प्रक्रिया करणाऱ्या कारखानदारांची इथल्या किनाऱ्यावर कलेक्शन सेंटर्स आहेत. या सेंटर्समधून अनेक देशांना माल निर्यात केला जातो.  इथे येणाऱ्या एकूण माशांपैकी  ७५ – ८०% माशांचा लिलाव होतो तर २० – २५% मासे कारखानदारांच्या बोटीचे असतात. काही मोठे खरेदीदार यांत्रिक होड्यांना आगाऊ रक्कम देऊन कोळंबी खरेदीसाठी अग्रक्रम मिळवतात. किनाऱ्यावर डिझेल व बर्फ पुरवणारी केंद्रे आहेत. मासळी करता मोठ्या प्रमाणावर बर्फ खरेदी केला जात असल्याने येथील बर्फाची विक्री तडाखेबंद आहे. आणि नियंत्रित दारात डिझेल मिळवणे हेसुद्धा जिकरीचे काम  असते. शिवाय वाढते डिझेल दर आणि घटते मत्स्योत्पादन ही मच्छिमारांपुढची मोठी समस्या आहे.

संध्याकाळी बाजार  आवरल्यावर किनाऱ्यावर टाकाऊ माशांचा ढीग राहतो. तो ढीग सुकवून ‘कुटी’  खत तयार केले जाते. उरले- सुरले जे असेल ते कुत्रे किंवा पक्षी खातात. हर्णै बंदर हे मत्स्य व्यापाराचे एक मोठे केंद्र म्हणून विकसित झाले आहे. हर्णेचा मासळीबाजार हा रायगड रत्नागिरी मधला सगळ्यात मोठा बाजार आहे. दापोलीत येणारे पर्यटक सुद्धा या लिलावात मोठ्या हौसेने सहभागी होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here